Monday, July 25, 2011

आमची मुंबई..!!


मुंबई...!! अथांग सागर.. माणसांचा.. भावनांचा.. अनुभवांचा..!! सगळीकडे घाणच घाण... लोकलमध्ये गळणारा घाम... रस्त्यावर ओथंबून वाहणारी वाहतूक तर मुंग्यांना हि हेवा वाटावा अशी लोकलला "लागलेली" माणस... पोटाला लागत म्हणून घाई घाईत खाणारी लोक तर पोटासाठी धाव धाव धावणारी लोक... पैश्यात लोळणारी आणि महागड्या गाडीतून "कुडकुडत"... जाणारी लोक तर कुठे रणरणत्या उन्हात घाणीत एक घास शोधणारी पोर... लाईन लावावी लागू नये म्हणून लोकलचा पास घेणारी लोक तर सकाळी शोच्यालायासाठी लाईनीत उभी राहणारी लोक.. बसमध्ये एका जागेसाठी लोटालोटी करणारी लोक तर चाळीतल्या लहानश्या घरात कोंबून कोंबून राहणारी लोक... कुठे श्रीमंतीची प्रदर्शन करणारी मुलं तर कुठे फाटक्या झोळीतून डोकावणारी पोर... पाईप लाईन मधून थेंब थेंब पाणी पिणारी लोक तर कुठे महागड्या दारूचे ग्लासच्या ग्लास रिते करणारी लोक... कुठे थांबण्यासाठी एक क्षण वेळ नसताना धावणारी लोक तर तर त्या क्षणात रस्त्यावर दोन क्षण चप्पल काढून गणपतीचा नमस्कार करणारी लोक... अत्यंत ऐशोआरामात जगणारी लोक तर मोडकळीस आलेल्या इमारतीमध्ये जीव मुठीत घेऊन राहणारी लोक.. कुठे पूर्ण अंग झाकत रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या मुली तर कुठे किळसवाण्या कपड्यात वावरणाऱ्या उचाभ्रू मुली... एक शहर त्यात असंख्य गोष्टी.. काही शिकण्यासारख्या.. काही अनुभवण्यासारख्या.. काही बघून मान वळवण्यासारख्या तर काही वळून वळून बघण्यासारख्या.. काही बघून शुध्द हरप्न्यासारख्या तर काही बघून स्वताची जाणीव करून देण्यासारख्या... काही माणुसकी शिकण्यासारख्या तर काही माणूस असल्याची लाज वाटण्यासारख्या...

सगळ डोळ्याला दिसत... सगळ कानावर येत... काही क्षण उदास वाटत... ह्या सगळ्याचा कंटाळा येतो... ह्या धावपळीचा उबग येतो.. "गड्या आपलाच गाव बरा" असा विचार मनात येतो... मात्र दुसरया क्षणी ह्या धावपळीत माणूस म्हणून जगणारे लोक दिसतात... लोकलमध्ये पाय ठेवायला जागा नसताना स्वताच चांगल खिडकीच आसन सोडून परक्यांना बसू देणारे आणि स्वत: उभ राहणारे हि फक्त इथेच भेटतात... दुसरयांच्या खांद्यावरून आपल सामान डोलत डोलत जागेवर जाताना "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे" हे गाणं जणू लोकलवरच लिहील्याच वाटू लागत... आपल्याला सगळ जाणवत असत.. मात्र ते विश्व नुसत धावत असत... माणुसकी जपत असत आणि जीवन घडवत असत... जीवनाचं ध्येय लोकलच्या वेळेवर अवलंबून असत.. घराला आकार असो वा नसो पण चाकोरीबद्ध जीवनाला आकार लावण्याचा प्रयत्न सगळीकडे सुरु असतो... कुणाला कुणासाठी वेळ नसतो मात्र आयुष्य मात्र वेळेच्याच अधीन असत...

हे सगळ ऐकून, हे सगळ बघून कधीतरी मुंबईची कीव येते... पण हि कीव करणारी मुंबई सगळ्यांना जीव लावते.. भैया आणि भाऊ चा फरक ती मानत नाही.. जात पात कुठे दिसत नाही... सिद्धीविनायाका सोबत हाजीअलीच्या दर्शनालाहि रांगा लागतात.. अरबी समुद्र हि मुंबईच्या सर्व गोष्टीला साक्षी असतो आणि आकर्षणापोटी तोहि गेटवे च्या वेशीवर उचंबळून बाहेर येऊ बघतो आणि ह्या माणसाच्या समुद्रात स्वताची जागा दाखवण्याचा प्रयत्न करतो... इथे येऊन कुणी मोठा हिरो बनतो.. तर कुणी तिथे येऊन झिरो होतो.. पण तरी लोंढे येत राहतात.. अस्तित्व शोधत राहतात आणि दोन घासासाठी, चार भिंतीसाठी प्रत्येक क्षण धडपडत राहतात...

हे मात्र खर..! सारया महाराष्ट्राचं जीवन एकीकडे आणि मुंबईच जीवन एकीकडे... मुंबईत असताना तिथे फिरणं म्हणजे धावपळ वाटते पण ती धावपळ पुन्हा पुन्हा आकर्षित करते आणि परतल्यावर हि खुणावत राहते... सारया जगाची सफर थोड्या वेळात करायची असेल तर मुंबईला भेट द्यावी.. जगातील सर्व ऐशोआरामाच्या गोष्टी इथे सहज उपलब्ध होतात तर कधी इथे उपलब्ध असलेल्या शुल्लक गोष्टींची टंचाई हि इथे दिसते.. एकीकडे लुभावणारा सी लिंक दिसतो तर तिकडे बघता बघता गाडी खड्यात जाण्याची हि शक्यता असते.. गुन्हेगारापासून राजकारण्यांचा हाच आवडता अड्डा आहे आणि त्यांच्या धाकाने, साथीने हे शहर अंगावर घाव सोसतच राहत आणि काहीही झाल तरी धावतच राहत...

तरी मुंबई ती मुंबई...! तिला तोड नाही.. तिच्यासारख जगात दुसर कुणी नाही... मुंबई नुसत एक शहर नाही.. ते नेमक काय आहे ते सांगण हि कठीण आहे.. तिला अवर्णनीय म्हणता येत नाही पण कुठल्या शब्दात हि वर्णन करता येत नाही.. तो एक अनुभव आहे.. तो बोलून कळत नाही.. तो तिथे राहूनच जाणवतो... तिच्याविषयी बोलल्याशिवाय कुणी तिथून परतत नाही.. आणि तो अनुभव कुठल्या आवरणात हि ठेवता येत नाही... शहराला हि जीव असतो अस हे अदभुत शहर.. जो अनुभवतो तोच जाणतो कि इथे जीवाची मुंबई होत नाही तर "जीवा" ची मुंबई खरच जीव लावते... आणि नकळत सारया जणांची आपुलकीची "आमची मुंबई" होऊन जाते...

--स्नेहल

No comments:

Post a Comment