माझी नवग्रह शांती..!!
माझा जन्म नेमक्या कोणत्या मुहूर्तावर झाला आणि माझ्या जन्माच्या वेळी ग्रहांची दशा आणि दिशा इतकी का वाईट होती ह्याचा जाब मी एकदा त्या ग्रहांनाच विचारणार आहे.. वेळी अवेळी, नको त्या वेळी मी कुठल्या संकटात सापडेल किंवा कोणाला संकटात टाकेल हे कदाचित त्या ग्रहांना हि माहित नसते.. किंबहुना त्या ग्रहांनाच माझ्यामुळे साडेसाती लागत असावी असा कधी कधी माझ्या मनात विचार येतो.. आपल्या राशीत हा का येऊन बसलाय म्हणून ते हि चिंतेत असावेत आणि कदाचित ते त्यांच्या राशीतून मी जावे म्हणून माझी हि शांती करायचा विचार करत असावेत..
काही म्हणजे काही माझ्याबाबतीत व्यवस्थित घडत नाही.. पाणी तुंबलेल्या रस्त्यावर मी कपडे खराब होऊ नये म्हणून दुसरया गाड्यापासून वाचण्याच्या प्रयत्नात जोरात गाडी घेऊन जातो आणि स्वताच्याच गाडीच पाणी स्वताच्या अंगावर उडवून होणार नसेल त्यापेक्षा जास्त खराब कपडे घेऊन घरी येतो.. एकदा घरी आल्यावर जे अकलेचे वाभाडे निघतात ते वेगळे.. एकदा सिग्नलवर पोलिसाने दुसरया कुणाला तरी पकडले, तिकडे पाहत पाहत मी दुसरया पोलिसाला जावून धडकलो आणि उगीचच्या उगीच शंभर रुपये देऊन बदल्यात दोन शिव्या घेऊन आलो.. गाडीवर जाता जाता माझ्यामागे असे कुत्रे लागतात कि मी ह्याचं काय घोड मारलंय ह्याचा मला प्रश्न पडतो.. बाकी कुणाच्या मागे लागत नाहीत पण माझ्याशी ते कुठल्या जन्माचं वैर काढतात ते काही मला कळत नाही..
दिवाळी मध्ये रस्त्यावरून जायची मला जाम भीती वाटते आणि सुतळी बॉम्ब नावाचा प्रकार तर माझ्यावर डाव ठेवूनच असतो.. मी जेव्हा त्याच्याकडे बघत असतो तेव्हा तो कधीच फुटत नाही.. पण त्याच्या जवळून जाताना तो इतक्या जोरात फुटतो कि माझ हृदय उडून खाली यायला बघत.. अहो, मी स्वतः त्याची वात पेटवतो तरी तो कधी फुटत नाही.. पण का फुटला नाही हे बघायला जवळ जातो तर तेव्हा मात्र तो नेमका फुटतो..
घरी कधीतरी रहस्यमय सिनेमा बघण्याची मला हौस येते.. पूर्ण सिनेमा बघतो आणि शेवटी एखादा श्वास रोखून धरणारा सीन सुरु असतो तितक्यात नेमके लाईट जातात आणि माझा श्वास रोखलेलाच राहतो.. बाहेर जाऊन सिनेमा बघायचं ठरवतो तर माझा नंबर येतो तेव्हाच बरोबर तिकीट संपतात.. तिकीट तर मिळत नाही पण पार्किंगवाल्याला पाच रुपये दिल्यामुळे त्याचा तेव्हढा चहा मोकळा होतो.. पावसाळ्यात हि रेनकोट घेऊन बाहेर पडल तेव्हा चुकून सुद्धा पाऊस येत नाही आणि कधी कधी कडक उन्हात तो धो धो कोसळून माझी तारांबळ उडवतो..
शाळा कॉलेजच्या परीक्षा म्हणजे तर जीवावरच संकटच असायचं.. सगळा अभ्यास करून जेव्हा मी पेपर द्यायला निघायचो तेव्हा खरच त्याच विषयाचा पेपर आहे ना ह्याची मला शंका यायची.. सगळा अभ्यास झाल्यावर घरून निघताना मी वेळापत्रक पुन्हा एकदा बघून घ्यायचो.. एक तर रात्री स्वप्नात हि मी न चुकता रोजचा पेपर द्यायचो कारण पास होण्याची खात्री मला फक्त स्वप्नातच वाटायची.. त्यात एकाच दिवशी आणि रात्री दोन दोन पेपर दिल्यावर दुसरया दिवशी नेमका कोणता पेपर आहे ह्यात मी नेहमी गोंधळून जायचो.. पण स्वप्नात हि मी पेपरला कधी वेळेवर पोहोचायचो नाही.. स्वप्नात एकतर माझी सायकल पंक्चर व्हायची नाहीतर घरातून निघायला उशीर व्ह्यायचा.. ह्यामुळेच मी दचकून उठायचो आणि अभ्यासाला लागायचो.. मात्र स्वप्नात मी रिझल्ट घ्यायला अगदी वेळेवर पोहोचायचो पण वेळेवर पोहोचून हि तो रिझल्ट हातात आलेला आणि पास झालेला मला कधीच दिसायचं नाही..
कुणाच्या लग्नाचं आमंत्रण असेल तर त्या वऱ्हाडा पेक्षा मला जास्त भीती वाटते कि ह्यांच्या लग्नाला कुणी येतील कि नाही.. हनिमूनला ते नवे नवरा बायको जातात आणि इथे मला त्या ठिकाणच्या हवामानाची काळजी वाटते.. ते तिकडे मजा करतात आणि टीवी वर मी त्या ठिकाणच्या हवामानाच्या बातम्या बघत असतो.. काही कारण नसताना दुसऱ्याचा विचार करायचा आणि स्वत: संकटात सापडायचे किंवा अजाणतेपणी दुसऱ्यावर संकट आणून टाकायचे हा माझा नित्यक्रम झालाय..
एकदा एका लग्नात गेलो होतो.. नवरदेवाच्या मिरवणुकी सोबत जाता जाता रस्त्यावर छोटा दगड दिसला.. सवयीप्रमाणे त्याला पायाने जोरात उडवला तसा तो नवरदेवाच्या घोड्याला जोरात जाऊन लागला.. तो घोडा उधळला आणि त्या नवरदेवाला घेऊन जवळच्या झाडामध्ये जाऊन घुसला.. सगळे त्याच्या मागे पळाले आणि नवरदेवाला कसे बसे खाली उतरवले.. नवरदेव खाली आणि त्याचा फेटा झाडावर लटकत होता.. त्याच्या मनात त्या घोड्याची अशी भीती बसली कि तो घोड्यावर बसायलाच तयार होईना.. शेवटी कुणाची तरी गाडी बोलावली आणि त्याला मंडपात पाठवलं.. नंतर झाडीत माझ लक्ष गेल तर घोडा हि माझ्याकडे रागाने बघत असल्याच मला जाणवलं.. उगीच वाद नको म्हणून मी हळूच मान फिरवून घेतली..
अश्या असंख्य गोष्टी आहेत... कधी कधी मला प्रश्न पडतो नेमक मला घडवताना देव झोपला होता कि मला बनलेला बघून त्याने डोळे लावून घेतले होते.. पण दोघांपैकी एक तर नक्की झाल असणार हे मात्र नक्की..
जी गोष्ट आताची तीच लहानपणाची .. पण तेव्हा माझे ग्रह दुसऱ्याना धोकेदायक ठरायचे आणि सगळे माझ्यापासून दोन हात दूरच राहायचे.. माझ्या मम्मीला माझी खूप काळजी असायची.. लहानपणी ह्या अश्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी ती माऊली मला कुठल्या कुठल्या ब्राह्मणाकडे आणि ज्योतिष्याकडे घेऊन जात असे.. आता ग्रहांच्या राशीला ग्रहण म्हणून मीच लागलेला असताना, हा ब्राह्मण माझ काय भल करणार असा विचार मला नेहमी यायचा, तरी सुद्धा फक्त मम्मीच्या आग्रहाखातर मी त्यांच्याकडे जात असे..
एकदा मम्मीने मला गल्लीतल्या एका ब्राह्मणाकडे नेल होत.. मम्मीने माझ्या व्यथा त्याच्यासमोर मांडल्या.. एखाद्या कथेसारख्या त्याने रस घेऊन आणि दात विचकून त्या ऐकल्या.. माझ्या समस्या त्याला विनोद वाटत होत्या... काही काही वेळा तर तो इतका हसत होता कि मला आधी त्याची कुंडली बघून त्याच्या ग्रहांची दिशा बदलून टाकावी वाटत होती.. आमच्या गप्पा ऐकता ऐकता तो बाजूच्या पेटीत ठेवलेले काजू खात होता.. फुकटात मिळालेले असतील नाहीतर त्याने कधी काजू खाल्ला असेल अस मला कुणी छाती ठोकून सांगितलं असत तरी माझा विश्वास बसला नसता.. आणि त्याच तोंड बघून हि काजू खाण्यासारखी त्याची परिस्थिती असेल अस हि वाटत नव्हत.. मी मुद्दाम मधेच त्याला प्रश्न केला.. आजोबा, काय शेंगदाणे खाताय का..? हातात काजू असताना मी असा प्रश्न विचारल्यावर म्हाताऱ्याने माझ्याकडे इतक्या खुनशी नजरेने माझ्याकडे बघितलं कि मला वाटल हा आता माझा काटा काढण्यासाठी लगेच गाडी पकडून वर जाईल आणि माझ्या ग्रहांना माझ्या राशीतून काढून अस्त्यावस्त करून टाकेल.. तितक्यात मम्मी ओरडली, गप्प बस, हां तर गुरुजी, ह्याच काहीतरी करा हो.. आता हे गुरुजी माझ्या राशीतल्या ग्रहांना काय शिकवणार होते ते मी कान देऊन ऐकू लागलो.. थोडा वेळ पंचांगसारख कसल तरी पुस्तक उघडून बोटावर काहीतरी बेरीज वजाबाकी करत होते.. माझ्या मनात विचार आला, हा गुरुजी काही कधी शाळेत गेलेला दिसत नाही.. इनमिन नऊ ग्रहामध्ये काय इतकी बेरीज आणि वजाबाकी करायची..? मी म्हाताऱ्याला म्हंटल, गुरुजी घरून calculator घेऊन येऊ..?? तसा म्हातारा अजून संतापला पण मम्मीकडे बघत हसून म्हणाला, ह्याला कस सांभाळता हो तुम्ही..? ह्याचे ग्रह हि वैतागलेत ह्याला..?? मम्मी घाबरली आणि तिने विचारलं, म्हणजे..? म्हातारा म्हणाला, एक मिनिट, अस म्हणून पुन्हा बेरीज वजाबाकीच्या खेळात रंगला.. मी एकटक त्याच्याकडे बघत होतो आणि त्याने एकदम दचकून वर बघितलं.. मला वाटल ह्याला वर पाल दिसली असेल म्हणून मी घाबरून पटकन उभा राहिलो... आणि माझी उभ राहण्याची गती बघून म्हातारा स्वत: दचकला.. आणि काय झाल रे..? म्हणून माझ्यावर खेकसला.. म्हंटल, तुम्ही एकदम वर बघितलं, मला वाटल पाल आली.. तर म्हातारा म्हणाला, नाही रे मी ग्रहांची दिशा बघत होतो... म्हंटल, इथे बसून..?? इथून तर मला फक्त तुमच्या घराची दशा दिसतेय आणि तुमच्या राशीला माहित नाही पण घराला तर सगळे जाळेच जाळे लागले आहेत.. पण हे सगळ मी फक्त मनातल्या मनात बोललो... मम्मी म्हणाली, खाली बस.. गुरुजींनी सांगितलं ना, वर काही नाहीये.. आता माझा कधी शाळेतल्या गुरुजीवर विश्वास बसला नाही तर नऊ ग्रहाच्या बेरजेत अर्धा तास अडकलेल्या ह्या गुरुजीवर माझा काय विश्वास बसणार.. पण मम्मीवर विश्वास ठेऊन मी पुन्हा खाली बसलो.. म्हातारा परत माझ्या राशीच्या ग्रहामागे हात धुवून लागला.. माझ्या ग्रहांना आज हा चांगलाच ग्रहण लावणार हे आता मी ओळखून चुकलो होतो.. थोड्या वेळाने, म्हातारा म्हणाला, ह्याच्या कुंडलीचा सखोल अभ्यास करावा लागेल.. मनात म्हंटल, अरे माझे ग्रह वर आहेत तू खोल कुठे चालला..? आता ग्रह पाताळात हि असतात अस मला वाटायला लागल होत.. एकतर म्हताऱ्याला बचाबचा काजू खाताना बघून आता मला हि भूक लागली होती.. पण म्हातारा मला एक काजू घे अस म्हणत हि नव्हता.. माझ्या कुंडलीचा सखोल अभ्यास करण्यासाठी म्हातारा माझी कुंडली बाजूला ठेऊन कुठल्यातरी पुस्तकात डोक घालून बसला होता.. मम्मी म्हणाली, बघ गुरुजी किती हुशार आहेत.. मनात आल गुरुजीच शाळेतल प्रगती पुस्तक मागवाव.. कारण प्रगती पुस्तकात जितके मार्क तितकी हुशारी इतकच आपल्याला माहिती आहे.. पण मी ते हि नाही मागवलं.. मी मनातल्या मनात ग्रहांना म्हणालो, अरे बाबानो, जिथे आहात तिथेच थांबा, हा म्हातारा येतोय तुम्हाला शोधायला.. अस म्हणून गुरुर्जीच्या शिकवणीची वाट बघत बसलो... थोडा वेळ झाल्यावर लक्षात आल.. आधी गुरुजीच तोंड पुस्तकात होत आता पुस्तक गुरुर्जीच्या तोंडावर होत.. माझ्या ग्रहांना शोधता शोधता म्हातारा चक्क झोपला होता.. मम्मीला म्हंटल, मम्मी हे गेले कि काय..?? मम्मी रागावली, गप्प बस.. काहीतरी काय..! पण मम्मीला हि तेच वाटत होत.. मी हळूच उठलो आणि गुरुजी जवळ गेलो.. आणि हळूच त्याच्या कानात म्हणालो.. गुरुजी,, ओ गुरुजी..! इतक्या प्रेमाने म्हातारा काही उठला नाही.. माझ्या ग्रहांना शांत करता करता हाच शांत झाला होता.. मम्मीला म्हंटल, चल घरी, हा गुरुजी काही कामाचा नाही.. मम्मी म्हणाली, अरे अस बोलू नये.. वयस्कर आहे ते.. मनात आल वयस्कर आहेत पण सगळ्यांना सोयीस्कर वेड बनवतोय.. मम्मीला म्हंटल, चल ना घरी, मम्मी म्हणाली, अरे अस चांगल दिसत का..? थोडा वेळ थांबू आणि जाऊ, गुरुजी उठतील इतक्यात.. मी म्हंटल आणि कायमचेच उठले असतील तर..? मम्मीला हि हसू आल.. पण म्हातारा काही उठत नव्हता.. आणि काय कराव काही कळत नव्हत तितक्यात मला आठवल, माझ्या खिशात खेळण्याची एक गोटी होती.. मनात आल, शाळेत हि बघितल्यावर गुरुजी वर्गात उभ करतात, आज ह्या गोटीने ह्या गुरुजीला उभ करू.. म्हणून मी ती गोटी उचलली आणि म्हाताऱ्यावर नेम धरून मारणार तेव्हढ्यात म्हाताऱ्याने मोठी जांभई दिली.. त्या आवाजाने घाबरून ती गोटी माझ्या हातातून सुटली आणि सरळ गुरुजीच्या पेटीत जाऊन पडली.. मी कपाळाला हात मारला.. गुरुजी उठले आणि बारीक डोळे करून माझ्याकडे बघितलं.. मी पूर्ण दात दाखवून गुरुजीकडे बघत होतो.. ते बघून गुरुजी हि ओशाळले... मी विचारलं, झाली झोप..? ते ऐकून नशीब गुरुजीने हातातलं पुस्तक मारून नाही फेकल.. त्याची इच्छा झाली होती ते मात्र त्यांच्या हावभावावरून मला चांगलच कळलं.. गुरुजी मम्मीला म्हणाले, हे बघा ताई.. ह्याची नवग्रह शांती करावी लागेल.. झोप काढून गुरुजी स्वत: तर चांगले शांत झाले होते आता मला शांत करण्यामागे लागले होते.. मम्मी म्हणाली, हो मला वाटलच होत..! मम्मीकडे बघून मनात विचार आला.. मम्मी तू पण.!! मी मम्मीला म्हंटल, अग तुला वाटतच होत तर इथे कशाला आणलस.. घरच्या घरीच करून घेतली असती ना.. म्हातारा गिर्हाईक हातच जात कि काय हे बघून म्हणाला, अरे ती काय घरी करता येते का..? मी वैतागून म्हंटल, मग काय वर जाऊन करणार आहात का..? म्हातारा वैतागून पण हसत हसत म्हणाला, कित्ती ती विनोद बुद्धी आहे रे तुझ्याकडे.. माझ्या लक्षात आले कि आता ह्या गुरुजी आता जाम पेटलाय .. म्हातारा म्हणाला, अरे ती महादेवाच्या मंदिरात करावी लागते.. आता महादेव नावाचा आमच्या गल्लीत एक माणूस होता, मला वाटल त्याच्या घरी जाऊन त्याच्या देवघरापुढे पूजा करायची.. मी म्हंटल महादेव काकाच्या घरी मी नाही जाणार.. करायची असेल तर माझ्या घरीच पूजा करा.. शेवटी मम्मी रागावली.. तू गप्प बस रे.. आधीच ग्रहांची वाट लावून ठेवली आहेस.. आता निदान गप्प तरी बस..! ते ऐकून मनात विचार आला.. मी.??? डोक खाजवत खाजवत मी विचार करत होतो.. ग्रहांची वाट मी कधी लावली..? नंतर मम्मीला विचारू अस म्हणून मी गप्प बसलो.. मम्मी म्हणाली, गुरुजी तुम्ही सांगा काय तयारी करायची.? कधी पूजा करायची आणि त्यासाठी काय काय वस्तू आणाव्या लागतील.. म्हातारा तर जाम खुश झाला होता आणि ब्राह्मण असून, सापडला एकदाचा बकरा अश्या दुष्ट नजरेने माझ्याकडे बघत होता.. म्हाताऱ्याने लिस्ट करायला सुरवात केली.. स्वताच्या घरातील काय काय वस्तू संपल्या आहेत ते आठवून आठवून म्हातारा लिस्ट करत होता आणि त्या सोबत एका मागे एक पेटीतील काजू दाबत होता.. लांबलचक लिस्ट तयार झाल्यावर मम्मीला म्हणाला, हे बघा ताई, ह्या वस्तू आणाव्या लागतील.. मम्मीने विचारलं, आणि गुरुजी तुमची दक्षिणा..? गुरुजी म्हणाले.. द्या काय द्यायची ते.. मम्मी म्हणाली.. अस नाही.. नक्की सांगा.. गुरुजी म्हणाले.. बघा तुम्हाला योग्य वाटेल ते द्या.. मी मम्मीला म्हंटल.. मम्मी दहा रुपये देऊन टाकू.. तसा म्हातारा जागेवरूनच उडाला आणि म्हणाला.. दहा रुपये.?? दहा रुपयात काय येत..? मी म्हंटल, गुरुजी दहा रुपयात कित्ती गोट्या येतात माहितीये का तुम्हाला..? आता हा म्हातारा दहा रुपयांच्या गोट्यांच काय करणार हा विचार तेव्हा मला आला नाही.. मम्मी म्हणाली, गुरुजी तुम्ही ह्याच नका ऐकू, तुम्ही सांगा किती दक्षिणा होईल ते.. गुरुजीनी सांगितलेला आकडा बघून आमचे हात पाय वाकडे व्हायची वेळ आली.. गुरुजीनी दोन हजार दक्षिणा सांगितली.. ग्रह माझे आणि ते फिरवण्यासाठी ह्याला आता दोन हजार मोजावे लागणार..?? इतक्या पैश्यात तर मी स्वत: जावून ग्रहांना जागेवर लाऊन आलो असतो.. शेवटी दीड हजारावर बोली ठरली आणि पूजा करण्याचा दिवस ठरला.. माझे ग्रह शांत होण्याची वेळ आली होती पण म्हातार्याची भूक काही शांत होत नव्हती.. त्याच काजू खाण सुरूच होत.. जाता जाता मम्मीने गुरुजींचा नमस्कार केला आणि मला म्हणाली, खाली वाक आणि गुरुजींचा नमस्कार कर.. इच्छा नव्हती पण मी खाली वाकलो आणि पायाला हात लावला तेव्हढ्यात मला आशीर्वाद द्यायचा सोडून गुरुजी जोरात ओरडले.. त्या आशीर्वादाने तर मी अक्षरशः भेदरलो.. वर बघितलं तर म्हाताऱ्याने तोंडातून काहीतरी बाहेर काढलं.. मला वाटल गुरुजींनी काहीतरी जादू केली असेल.. न जाणो एखादा वक्र ग्रह तर ह्या बाबाच्या तोंडातून बाहेर नाही आला.. हे बघण्याची आता मला हि उत्सुकता होती.. गुरुजींनी मुठ उघडली तर त्यात होता एक दात आणि त्यासोबत एक गोटी...! निरखून बघितलं तर ती तीच गोटी होती जी माझ्याकडून त्या पेटीत पडली होती.. काजू सोबत म्हाताऱ्याने गोटी हि खाण्याचा प्रयत्न केला होता.. मला तर हसूच आवरेना.. पण म्हाताऱ्याला अजून उकसावण्याची माझी इच्छा झाली नाही.. पण माझ्या गोटीने माझ्यातर्फे म्हातारयाचा बदला घेतला होता.. माझ भविष्य बदलवण्याच्या नादात म्हाताऱ्याला आता स्वताचा दात बदलवावा लागणार होता.. माझ्या ग्रहांच्या वक्रदृष्टीत आता म्हाताऱ्याच तोंड वक्र झाल होत.. माझी कुंडली खरच किती भयानक आहे हे बिचारया गुरुजीला कळून चुकल होत आणि आता माझ्यासाठी नाही तर स्वताच्या स्वास्थासाठी आणि हितासाठी त्याला माझे ग्रह शांत करणे भाग होते.. आणि पूजेचा दिवस आला..
रात्रीपासूनच घरात लगबग सुरु होती.. पहाटे सगळे लवकर उठले आणि तयारी करून मंदिरात पोहोचले तेव्हा लक्षात आल कि मी तर घरीच राहिलो.. मम्मी परत आली तेव्हा मी डाराडूर झोपलो होतो.. मम्मी जोरात ओरडली, अरे मेल्या उठ..! सगळे जण मंदिरात हि पोहोचले.. गुरुजी पण येतील इतक्यात.. शांतीच्या दिवशी सुध्दा माझी सकाळची शिवी टाळली नाही.. तरी मम्मीला म्हंटल, मी नाही येत, तुम्ही करून घ्या पूजा.. मम्मी तर भयानक खवळली.. तो रुद्रावतार बघून नेमक शांत करण्याची गरज कुणाला आहे ह्याची मला शंका आली.. शेवटी वैतागून उठलो आणि शांत होण्यासाठी मम्मी सोबत उड्या मारत मारत मंदिरात पोहोचलो.. मंदिराचं वातावरण अगदी प्रसन्न होत.. मंदिर छोटच होत.. महादेवाची पिंड आणि समोर रेखीव नंदी होता.. त्या वातावरणात शांती होण्या आधीच मी शांत बसलो होतो.. समोर मोकळ पटांगण होत.. मंदिरासमोर आंब्याच मोठ्ठ झाड होत, ज्याला खूप कैऱ्या लागल्या होत्या.. मैदानात मुल मनसोक्त खेळत होते आणि इथे सगळे मला खेळायला न सोडता शांत करण्यामागे लागले होते.. गुरुजींनी मला समोर बसायला सांगितलं आणि माझ्यावर जोरजोरात मंत्रोपचार सुरु केला..तो कर्कश्श आवाज ऐकून मंदिराच्या दारातून महादेवच तर बाहेर निघून नाही गेले हे मी उंचावून बघितलं.. पण नशीब महादेव तिथेच होते आणि ह्या गुरुजीचा प्रताप बघत होते.. स्वतावर बेतलेल्या अनुभवावरून गुरुजी मन लावून मंत्र म्हणत होते आणि कस हि करून माझे ग्रह शांत करण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते.. मला वाटल होत पाच मिनिटात पूजा संपेल.. नंतर कळलं कि खरी पूजा तर पाच मिनिटानंतर सुरु झाली होती.. माझ सगळ लक्ष मैदानात खेळणाऱ्या मुलांवर आणि आंब्याच्या झाडावरच्या कैर्यां वर होत.. गुरुजी मला त्या होमात काय काय टाकायला सांगत होते आणि मी हातात येईल ते भसाभसा ओतून कधी एकदा हे सगळ संपेल ह्याची वाट बघत होतो.. नंतर गुरुजींनी मला होमात थोड तूप त्याला सांगितलं.. माझ लक्ष खेळणाऱ्या मुलांकडे होत.. मी चुकून तुपाच्या वाटी ऐवजी रॉकेलचा ग्लास उचलला आणि भसकन होमात ओतला.. असा भडका झाला कि गुरुजी धोतर सांभाळत पळत सुटले आणि थेट मंदिराच्या आवाराबाहेर जाऊन थांबले.. मी पण घाबरलो.. मग पुन्हा तिथेही माझ्या अकलेचे वाभाडे काढल्यावर पूजा सुरु झाली.. नंतर गुरुजींनी माझ्या हातात लांब पळी सारखा चमचा दिला आणि म्हणाले ह्याने होमात तूप टाक.. मी ते सांगतील ते फक्त ह्यासाठीच करत होतो कि मला एकदाच तिथून सुटायचं होत.. तेव्हड्यात आंब्याच्या झाडावर काही मुल चढली.. मी त्यांची गम्मत बघत होतो.. आणि होमात तूप टाकता टाकता ती लाकडी पळी मी चुकून होमातच धरून ठेवली होती.. होमासोबत ती पण पेटली.. परत शिव्यांचा वर्षाव झाल्यावर मी शुद्धीवर आलो.. तीन तास होऊन गेले होते.. आता पूजा हि संपायला आली होती आणि मी पण थकलो होतो.. तुपाचे शेवटचे काही थेंब होमात टाकल्यावर म्हातारा म्हणाला ती पळी बाजूला ठेव आणि माझ्या हातात फुल ठेव.. मी चुकून ती गरम पळीच गुरुजीच्या हातात ठेवली आणि चटका बसल्याने गुरुजी जोरात ओरडले.. त्यांच्या अचानक ओरडण्याने सगळे घाबरले आणि जो तो गुरुजीच्या हातावर फुंकर घालत सुटला.. मी म्हणालो, गुरुजी हे फुल..! राहू दे तिथेच, म्हणून ते जोरात खेकसले आणि झाली पूजा, म्हणून ताडकन उठले.. मला त्या गुरुजीला चटका बसायचं काही वाईट वाटल नाही.. ह्या संकटातून सुटलो म्हणून मी उठून नाचायला लागलो आणि गुरुजीला विचारलं, गुरुजी ग्रह झाले शांत? हो झाले..ते पुन्हा ओरडले.. मी म्हणालो, मग मला कसे कळेल ग्रह शांत झाले ते.. म्हातारा आता जाम वैतागला होता.. कळेल दोन दिवसात.. म्हणून पुन्हा खेकसला.. दीड हजार घेऊन तो हात चोळत निघून गेला.. नवग्रह शांती अश्या पद्धतीने पूर्ण झाली होती आणि ती ह्याच गुरुजींनी केली ह्याची गुरुजीच्या हातावर कायमची निशाणी राहणार होती..
मी एकदाच सगळ संपल म्हणून खुशीत होतो.. माझ लक्ष मम्मी कडे गेल.. मम्मीच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.. आपल्या पोराच सगळ काही आता चांगल होईल ह्या वेड्या आशेत ती माऊली देवाचे आभार मानत होती.. ग्रह शांत झाले होते कि नाही ते मला कळले नाही पण त्या माऊलीच मन मात्र शांत झाल होत.. मला जवळ घेऊन म्हणाली होती.. माझ पोर आता नाव काढेल.. पण ग्रहांनी त्याचा अर्थ वेगळा घेतला आणि त्याच वर्षी माझ नाव शाळेतून काढावं लागल.. काही दिवसानंतर कळल कि गुरुजी हि आमची गल्ली सोडून लांब राहायला जात आहेत.. त्यामागे कारण काय होत ते कळलं नाही पण माझे ग्रहच त्याला कारणीभूत असावेत अस मला अजूनही वाटत..
आज ह्या सगळ्या गोष्टीला इतके वर्ष झालेत तरी आजही ते सगळे क्षण डोळ्यासमोर दिसतात, जुन्या आठवणी जागवतात आणि त्या भूतकाळात आजचे कठीण क्षण विसरायला लावतात.. हजारदा पूजाअर्चना केली, मंत्रोपचार केले पण आजही ग्रहांनी त्यांची स्थिती बदललेली नाही आणि माझी मायमाऊलीने त्यांना शांत करण्याची आशा अजूनही सोडलेली नाही..
--स्नेहल
No comments:
Post a Comment