Monday, July 25, 2011

देह...


झुंडीच्या झुंडी वेताळांच्या
झोंबल्याशिवाय सोडत नाही
दोन कवडीच्या बदल्यामध्ये
अब्रूला मोकळ सोडत नाही

रंगलेल्या चेहरयामागे
बेरंग आयुष्य कुणी बघत नाही
उत्तान शरीरा मागे
उध्वस्त मन कुणी शोधत नाही

प्रेमाचं कुणी भेटलं तरी
प्रेमाला इथे जागा नाही
मनात असली इच्छा तरी
इच्छेला इथे थारा नाही

नशिबी आले दुख
सोसण्याशिवाय पर्याय नाही
देवाने दिलाय देह
विकण्यावर काही उपाय नाही

वासनांध दुनियामध्ये
दिलदारांची तशी कमी नाही
चुकून कधी भेटले तरी
पुन्हा भेटीची मात्र हमी नाही

डोळे आपले असले तरी
स्वप्नावर नियंत्रण नाही
शरीराशिवाय निखळ प्रेमाचे
कुठलेही आमंत्रण नाही

आयुष्याचे फलित काय
ह्या जीवाला हि माहित नाही
देहाशिवाय ह्या जीवाला
कुणी कुठे विचारत नाही

आज आहे तारुण्य
भविष्याची चिंता नाही
देहाच्या बाजारामध्ये
भावनेचा गुंता नाही

देहाला लाख ओरबडणारे
कुरवाळणारे मात्र कुणी नाही
ह्या जगाच्या संसारात
संसारासाठी कुणी नाही

गिर्हाईक सुद्धा एक देह
त्याला काही भाव नाही
भाव असेल त्याला
ज्याला ह्या देहाची हाव नाही

--स्नेहल

No comments:

Post a Comment