Monday, July 25, 2011

माझी मुंबई वारी.. सोबत गोदावरी..!!


लोक पंढरपूरची वारी करतात पण मला परवा मुंबईची वारी घडली... पूर्ण प्रवास उपाशी पोटी, उभ्याने आणि रिंगणात घडल्यावर त्याला वारी शिवाय दुसर काही नाव द्याव अस मला वाटल नाही.. तसा तो सफर म्हणता आला असता कारण एका प्रवासात इतक suffer होण नशिबानेच येत... प्रवास खरच बिकट होता पण तुमच्यासाठी हसण मात्र फुकट आहे...

बरयाच महिन्याने किंवा एखाद वर्षानेच म्हणा, मुंबईच्या प्रवासाचा योग आला... कामाच हि निमित्त होत आणि मुंबई हि खुणावत होत.. असे सगळे योग जुळून आले आणि आमची स्वारी मुंबईच्या दिशेने प्रयाण करण्यासाठी सकाळी ८:३० वाजेशी नाशिक रेल्वे स्टेशनवर आली... तिकीट काढून platform वर आलो.. गर्दी कमी होती.. मनात आल काय मस्त वेळ निवडलीय जाण्यासाठी.. घाई गडबड न करता गाडीत मस्त जागा मिळेल... सुरवातीला एक गाडी आली. लखनऊ मुंबई गाडी होती.. बघितलं तर गाडीतले सगळेच माझ्या ओळखीचे होते (म्हणजे सगळेच आपले "भैया" होते) पण जरा वाजवीपेक्षा जास्तच होते, त्यामुळे ती गाडी सोडावी लागली.. नंतर वाराणसीहून एक गाडी आली.. तिची हि तीच कथा.. ती सुद्धा गाडी सोडली... दोन तीन गाड्या सोडल्यावर अखेर सव्वा नऊच्या गोदावरी एक्स्प्रेसनेच जायचं ठरवलं.. लगेच जागा मिळेल ह्या आशेने निवांत होतो आणि अगदी खुशीत होतो..पण पुढ्यात काय मांडलं होत ते समजण अजून बाकी होत...

आणि गोदावरी आली... गोदावरीचा अवतार बघून तर कपाळालाच हात मारला.. हात मारण्याच्या नादात दाराजवळ अजून गर्दी झाली.. गाडीत पाय ठेवायला हि जागा नव्हती... सगळ्या लोकांना माझ्याच सोबत प्रवास करण्याची इच्छा त्या दिवशी जागृत झाली होती.. गर्दीत चढण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हढ्यात एका बाईने तिच्या नवरयाचा हात समजून माझाच हात धरला आणि अहो चला ना लवकर म्हणत तिच्या नवरयाऐवजी मलाच मध्ये खेचला... बिचारा तो नवरा..!! त्याची बायको आत.. मी तिच्या हातात आणि तो दारात, अशी केविलवाणी अवस्था त्याची झाली होती.. गर्दीला रेटत रेटत मध्ये घुसलो.. जागा शोधण्यासाठी आहे त्या जागेवरच दोन चार उड्या मारल्या आणि कशीबशी जागा मिळवली.. ती पण दाराजवळ फक्त उभ राहण्यासाठी..! फक्त दोन पाय टेकता येतील एवढी जागा होती.. देवाने चार पाय दिले नाहीत ह्याबद्दल त्याचे शतशः आभार मानायला मी विसरलो नाही.. माझ्या शेजारी दारामध्ये एक जोडप येऊन बसलं.. निरखून बघितलं तर ती तीच महामाया होती जिने मला हात धरून वर चढवल होत.. मी तिला ओळखल पण मी काही ओळख दिली नाही.. त्यांच्या हावभावाकडे बघून, आणि नवऱ्याच उगीचच लाजण आणि त्या बयेच भाव खाण बघून वाटत होत कि त्याचं नुकतच लग्न झाल असाव.. गाडी निघाल्यावर तो नवरोबा आपल्या नव्या बायकोला आपण काय चीज आहोत ते दाखवण्यासाठी दरवाज्यात करामती करत होता.. त्या बघून त्याच्या बायकोला आणि काही कारण नसताना मला हि घाम फुटत होता.. त्या करामती आहेत कि कुणी त्याच्यावर भानामती केलीय ह्याचा विचार करत करत इगतपुरी आल..

इगतपुरी स्टेशन आल तशी गर्दीत अजून भर पडली.. एक महाभाग तर चार पोते घेऊन वर चढला.. एकटा असून, चला उचला रे अस ओरडल्यावर, इच्छा नसताना हि आमचे हात त्याच्या ओझ्याजवळ गेले, आणि नाईलाजास्तव आम्हाला हात लावावा लागला.. इथे ठेवा इथे ठेवा करत लक्षात आल कि तो स्वत: दूर उभा होता आणि त्याच ओझ आम्ही वाहत होतो.. एक एक करत आमच्या डोक्यावरून ते नंतर कुठल्यातरी सीटखाली गेले आणि तो हि येऊन माझ्याजवळ येऊन उभा राहिला.. माझ्या राशीला हळू हळू ग्रहण लागत होत.. तो उभा राहत नाही कि त्याच्यामागे तरातरा दोन आजीबाई चढल्या.. ह्या वयात कशाला ह्यांनी घराबाहेर पडावं आणि पडलच तर माझ्या गाडीत का चढाव असा एक समंजस विचार माझ्या मनात आला... शेवटी विचार करण्यासारखं माझ्याजवळ हि काही नव्हत आणि त्यात गोदावरीला तर माझ काहीच सोयर सुतक नव्हत.. गाडीने वेग घेतला.. आता माझ्या एका बाजूला नवीन संसाराच्या चर्चेत मग्न असलेल जोडप आणि दुसरया बाजूला सगळा संसार आवरून उगीच कुठेतरी जायचं म्हणून निघालेल्या ह्या आजीबाई... हे काय कमी होत म्हणून ह्या भाऊगर्दीत अजून एक चहावाला कुठून तरी घुसला.. धक्के मारत जाता जाता माझ्या पाठीला चहाची किटली टेकून गेला.. आणि चहा न पिता हि तो खरच किती गरम होता ह्याचा मला चांगलाच अनुभव आला.. पाठ चोळायला हि हाथ मागे जाऊ शकत नव्हता... चहावाल्यावर ओरडलो तर म्हणतो, जाऊ द्या हो साहेब, फुकटात गरम झाले.. दोन चार जणांनी दात विचकले.. त्याच्या बोलण्याचा विचार करत, तो आघात कसा बसा सहन केला आणि तेव्हढ्यात समोर लक्ष गेल तर माझ्या समोरच्या सीटवरची बाई मी काहीतरी मागेल अश्या भीतीने काहीतरी लपवून लपवून खात होती.. तस म्हंटल तर माझ्याकडे फक्त बसायला जागा नव्हती पण ती जणू मी एकदम फाटका असल्यासारखी माझ्याकडे बघत होती.. ह्या प्रवासात माझी नेमकी लायकी काय हेच आता मी विसरत चाललो होतो..

धक्के खात खात कसाऱ्याला आलो... आणि चक्क गर्दी कमी झाली म्हणजे चार माणस उतरली आणि दोन चढली.. आणि ते हि पाचवीला पुजल्यासारखी माझ्याच शेजारी येऊन उभी राहिली.. एकाने त्याच्या पाठीवर लटकवण्याची bag काही कारण नसताना माझ्या पुढ्यात लटकवली आणि माझ्या मागे उभा राहिला.. दोन दोन मिनिटाला त्याला भुकेचे दौरे पडत होते आणि मला बाजूला सरकवून bag मधून काय काय काढून खात होता.. कुठल्या वर्षाच्या दुष्काळात हा जन्मलेला असेल असा एक पूर्व नैसर्गिक आपत्तीचा विचार मनात डोकावला.. हा विचार करतच होतो कि टाळ्या वाजवायचा आवाज आला.. तश्या मी गाडीत कुणाला माझ्या कविता ऐकवल्या नव्हत्या मग उगीच टाळ्या कोण वाजवतंय हे वळून बघितलं तर एक तृतीय पंथी टाळ्या वाजवत वाजवत माझ्याच जवळ आला.. मी लक्ष नाही अस दाखवलं तर मलाच म्हणाला, ए इधर देख ना..! आता त्याच्याकडे बघण्यासारखा तो काय देखणा हि नव्हता पण आज नशिबी तोच पडला होता.. अजून काही घडायचं बाकी असेल म्हणून मला छळायला त्या दिवशी त्याची हि नियुक्ती झाली होती.. मला म्हणाला, ए पैसे दे ना..! मी सहज म्हंटल, मुझे बैठ्ने को एक सीट दे ना..! तर नालायक म्हणाला, तू मुझे पैसे दे, तुझको गोदी मे बिठाता.. आता गोदावरीच्या ह्या गोदीमध्ये बसण्यापेक्षा गोदातीरी जाऊन उडी मारण जास्त सोप्प आहे अस मला वाटू लागल.. तितक्यात तो पुन्हा म्हणाला, ए दे ना.. सुंदर दिखता ही तो क्या भाव खा रहा है..? आता सुंदर दिसण्यामुळे अशी हि आपत्ती ओढवू शकते हे मला कळू लागल होत.. त्याच आपल सुरूच, पैसे दे नही तो तेरे गाल पकडुंगा.. मनात विचार आला अरे बाबा कि बाई, "एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ" असे जरी म्हणत असलो तरी तुझा पंथ कोणता..?? माझा पंथ कोणता..?? माझ्या गालावर एक तृतीय पंथ्याची नजर होती हे बघून "गाल कि खाल" काढायचा माझा विचार होत होता.. इतक्यात मला हळूहळू हसण्याचा आवाज आला.. डोकावून बघितलं तर माझ्या शेजारची आजीबाई माझ्यावर आलेल्या संकटावर खुदुखुदू हसत होती.. आता त्या तृतीय पंथ्यापेक्षा मला त्या आजीबाईचा जास्त राग येत होता.. आजीचा काटा काढायचा असे मी ठरवले पण सध्या पहिली priority माझा गाल वाचवण्याची होती ... माझे अनमोल गाल त्याच्या हातात देण्याऐवजी पाच रुपये देणे मला जास्त रास्त वाटले आणि मी एकदाचा त्या तृतीय पंथ्यापासून माझा गाल वाचवला.. सुटलो एकदाचा असा विचार केला आणि तितक्यात त्या तृतीय पंथ्याचा हात माझ्याजवळ आला.. घाबरून मी दूर होणार होतो.. पण जागा होती कुठे..? पण त्याने काही नाही केल.. पाच रुपये दिल्यावर त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवून मला, खुश राहो असा आशीर्वाद दिला... त्या आशीर्वादाने लागलीच एक विषारी विचार माझ्या मनात डोकावला आणि मी त्याला म्हंटले, मुझे तो आशीर्वाद दे दिया अब इस दादी को भी आशीर्वाद दो..! हे ऐकल्याबरोबर आजीबाईच्या तोंडच हसणच पळाल.. माझ्या संकटावर हसणारी आजी आता स्वत: संकटात होती.. तो म्हणाला, ए दादी दस रुपये दे.. आजीची स्थिती आता जणू सगळी प्रोपर्टी त्याच्या नावावर करायची असल्यासारखी झाली... उगीच म्हातारीला हृदयावर झटका बसू नये म्हणून शेवटी मीच त्याला म्हंटल, जाने दो, बाद मे दे ना आशीर्वाद.. प्र याद से देणा हे सांगायला मी विसरलो नाही... पाच रुपयात मी त्याला इतक हक्काने सांगू शकत होतो.. ते एक संकट पाच रुपयावर टळल्यावर मी जरा निवांत होतो.. आणि पुढील संकटांची वाट बघत होतो.. आणि त्या दिवशी ते वाट न बघताच माझी वाट लावायला सारख सारख येत होत आणि तरी मी सर्व संकटाना मोठ्या हिमतीने तोंड देत होतो..

काहीवेळाने सगळ शांत झाल.. तितक्यात माझ्या बुटाखाली काहीतरी असल्याच जाणवलं.. एक तर हला-डूलायला जागा नव्हती.. बुटाने दाबून दाबून बघत होतो पण काय होत काही कळत नव्हत... आधीच त्या आजीचा मघासचा मनात राग होता.. वैतागत आजीबाईला ओरडून म्हंटल.. आजी ती पिशवी काढा ना पायाखालची, अस म्हणून अजून बूट जोरात दाबला.. आजीबाई बारीक आवाजात म्हणाली ती पिशवी नाहीये रे बाबा, माझा पाय आहे.. किती दाबशील..?? लाजिरवाणे होऊन मीच कसाबसा पाय सरकवला..

तेव्हड्यात शेजारच्या जोडप्यात कसली तरी पैज लावण्यावरून वादविवाद स्पर्धा चालू झाली.. नव्या नवेल्या बायकोला हि आता आवाज फुटला होता.. नवऱ्याला म्हणत होती तुम्ही नवरा आहे म्हणून तुम्हाला सोडून देते नाहीतर लावली असती पैज.. पैज कशावर लावणार होते ते काही कळलं नाही, मी पण विचारलं नाही.. पण लागली असती तर साक्षीदार म्हणून मलाच उभ रहाव लागल असत.. नेमके ते नवरा बायको होते कि सट्टेबाज होते ते काही मला कळले नाही.. पण एक कळलं कि ह्या बाबाचं उर्वरीत आयुष्य एक सट्टाच असणार आहे.. थोडा त्याच्या जीवनावर विचार केल्यावर मी स्वताचा विचार करायला लागलो..

एक एक स्टेशन जात होत तस ह्या भयंकर प्रवासाचं काय फलित निघणार ह्याचा विचार करत होतो.. एकाला विचारलं तेव्हा कळलं कि कल्याण अजून एक तासावर आहे.. जीव मुठीत घेऊन एक तास काढावा लागणार होता आणि मजल दरमजल करत अखेर माझी गोदामाई कल्याणला पोहोचली.. स्टेशनला उतरलो.. मागे वळून गोदामाई आहे कि गेली ते हि मी बघितलं नाही... मला कल्याण पूर्वला जायचं होत.. भाऊ स्टेशनवर घ्यायला येणार होता.. त्याने सांगितलं तस पूर्वेकडून बाहेर पडलो आणि रस्त्याला लागलो.. पण सगळ इतक सहज होईल अस त्या दिवशीच्या राशी मध्ये लिहिलच नव्हत.. नशिबाने तिथे हि साथ सोडली आणि चालत चालत मी दुसरया रस्त्याला लागलो आणि तो दुसरीकडूनच स्टेशनवर आला.. पण शेवटी मोबाईलच्या कृपेने राम -भरत भेट झाली आणि हि खडतर वारी पूर्ण झाली..

--स्नेहल

No comments:

Post a Comment